रताळ्याची बर्फी




रताळ्याची बर्फी


















उपवास म्हंटलं की तेच नेहमीचे पदार्थ साबुदाणा खिचडी , वरीचा भात , साबुदाणा खीर पण आपण ह्या उपवासाला काही नाविन्यपूर्ण व मी स्वतः केलेले खास उपवासाचे पदार्थ बघणार आहोत आणि खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील 
आज आपण रताळ्याची बर्फी करणार आहोत

साहित्य
वाफवलेले रताळे ४ ते ५
ओले खोबरे १/३ वाटी
तूप १ मोठा चमचा
दुधाची पावडर २ मोठे चमचे
गूळ १/४ वाटी किंवा गोडीनुसार
वेलची पूड १/२ लहान चमचा
बदाम पिस्ता केसर सजावटीसाठी

कृती
प्रथम वाफवलेले रताळे सोला व किसून घ्या ओले खोबरं किसून घ्या
गॅस वर पॅन किंवा कढई गरम करा त्यात तूप घाला किसलेले रताळे व खोबरे एकत्र करून मंद आचेवर परतवून घ्या खरपूस भाजले की त्यात दुधाची पावडर घाला व एकत्र करून घ्या
आता गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या गूळ वितळले की आच मंद करा व सतत परतत रहा जेणेकरून गूळ जळणार नाही मिश्रण छानसं एकजीव झाले की त्यात वेलची पूड घाला व एकत्र करून गॅस बंद करा
आता एका ताटाला तूप लावून घ्या व मिश्रण ताटात घालून पसरवून घ्या त्यावर बदाम पिस्त्याचे काप घालून घ्या व मिश्रण थंड होऊ द्या
थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात सुरीने कापून घ्या आणि मस्त रताळ्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या

टीप
दूध पावडर ऐवजी मावा घालू शकता
शक्यतो काळ्या गुळाचा वापर करावा
दूध घालू नये कारण रताळे हे मऊ असल्यामुळे बर्फी फारच नरम होईल व व्यवस्थित सेट होणार नाही
बदाम पिस्ते सजावटीसाठी वापरले आहेत बर्फीत घालू शकता

Comments